जरांगे पाटील एक सुद्धा उमेदवार उभा करणार नाही, त्यांची एकनाथ शिंदे अन् शरद पवारांशी कमिटमेंट; लक्ष्मण हाकेंचा घणाघात
जालना : जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) एक विधानसभा देखील लढणार नाही. जरांगे यांची कमिटमेंट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी आहे. मी बॉण्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे, जरांगे पाटील एक सुद्धा उमेदवार उभा करणार नाही. नाही ते निवडणूक लढणार. जरांगेंच्या बैठकीत कोण आहे, तर ते वाळू माफिया आणि दोन नंबर धंदेवाले आहेत. असे लोक जर निवडणुका लढत असतील तर त्यांचे स्वागत असेल. जिथे भल्या भल्या लोकांना चार आमदार निवडून आणता आले नाही, तिथे हे चालले 288 आमदार निवडून आणायला, असे म्हणत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
उपोषण सुटल्यानंतर काल कोणी गाड्या पुरवल्या, जरांगे यांना कोणी सपोर्ट केला? राजेश टोपे आदल्या रात्री भेटून जातात, दुसऱ्या दिवशी जरांगे ऍडमिट होतात. आम्ही काहीही मोघम बोलत नाही, तर आम्ही वास्तव बोलतोय. आम्ही उपोषणाला बसलो आणि जरांगेंचं उपोषण कोणत्याही शिष्टमंडळा शिवाय सुटलं. हे आमच्या आंदोलनाचे यश आहे. असेही लक्ष्मण हाके (Laxman Hake) म्हणाले.
राजेश टोपे शरद पवारांच्या स्क्रिप्टवर चालतात- लक्ष्मण हाके
राजेश टोपे स्वतःला सेक्युलरवादी समजतात. पण राजेश टोपे शरद पवारांच्या स्क्रिप्टवर चालतात. राजेश टोपे यांना शुभेच्छा आहे, तुम्ही घनसांवगी मतदारसंघात असेच राहा. एका जातीतचे काम करा, एका जातीच्या आंदोलनाला भेट देत रहा. असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते राजेश टोपे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
संभाजी राजे त्यांच्या अस्तित्वासाठी धडपडत आहे
संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि राजू शेट्टी काल मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली. या भेटीवरुनही लक्ष्मण हाके यांनी निशाणा साधत टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, हे सगळे वात भिजलेले तोटे आहेत, बच्चू कडू यांच्यामधला आंदोलक कधीच संपलेला आहे. असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी तिसऱ्या आघाडीवर टीका केली आहे. संभाजी राजे आणि जरांगे यांच्यात पुतना मावशीचे प्रेम आहे. याच्याशिवाय मला काही वाटत नाही. जरांगे ना स्वतःची गादी तयार करायची आहे.
संभाजी राजे त्यांच्या अस्तित्वासाठी धडपडत आहे. त्यांचा लोटा कधी लवंडेल आणि कधी पूर्ण रिकामा होईल हे सांगता येत नाही. संभाजी भोसले जरांगे यांचे नेतृत्व स्वीकारू शकत नाही. तर जरांगे संभाजी राजेंचे नेतृत्व स्वीकारू शकत नाही. यांची तिकीट कोण घेईल आणि घेतलं तर तिकीटवर कोण मतदान करेल यांना. संभाजी राजेंच्या हस्ते जरांगेनी पाणी घेतलं नाही. जरांगे यांना संभाजी राजेंना श्रेय द्यायचं नाही आणि संभाजी राजेंना देखील जरांगेंना मोठं करायचं नाही. संभाजी राजे आणि मनोज जरांगे कधीही एकत्र येणार नसल्याचे ही लक्ष्मण हाके म्हणाले.
परिवर्तन महाशक्तीने पहिले स्वात:च परिवर्तन केलं पाहिजे. कशाला महाराष्ट्राच परिवर्तन करायला चाललेत. तुम्हाला एकदा भाजपने खासदार केलं आता कोणी करेल या भ्रमात पडू नका, लोकशाही आता आता आहे, राजेशाही केव्हाच गेली आहे. शेखचिल्ली की हसीन सपने यांच्या पलीकडे परिवर्तन महाशक्ती काही नाही. परिवर्तनाचा अर्थ काय? कोणाचे परिवर्तन करायला चालले तुम्ही? असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी तिसऱ्या आघाडीवर टीका केली आहे.