नाशिक मध्यची मतदारसंघाची लढत होणार दुरंगी
नाशिक मध्यची मतदारसंघाची लढत होणार दुरंगी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत लढत होत आहे. 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार अंकुश पवार हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार अर्ज मागे घेणार आहेत. त्यामुळे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नाशिक मध्य मतदारसंघातील लढत दुरंगी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. आमदार देवयानी फरांदे आणि वसंत गीते यांच्यात पुन्हा थेट सामना रंगणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.
काँग्रेसच्या इच्छुकांनी अखेरपर्यंत प्रयत्न करूनही ही जागा उद्धवसेनेच्याच वाट्याला गेली. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. हेमलता पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केल्याने नाशिक मध्यची लढाई जिल्ह्यात चर्चेत आहे . पण डॉ. हेमलता पाटील यांनी अत्यंत नाराजीने माघार घेतली त्यामुळे नाशिक मध्यची लढाई दुरंगी झाली आहे. नाशिक मध्य मतदारसंघात मनसेचे उमेदवार अंकुश पवार आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी माघार घेतली. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार फरांदे यांच्या मतांमधील फाटाफूट टळली. हनीफ बशीर आणि गुलजार कोकणी यांच्या माघारीमुळे आघाडीला लाभ होण्याची शक्यता आहे.
लोकसभेच्या निकालात नाशिक मध्य मतदारसंघातून मविआच्या उमेदवाराला आघाडी मिळाल्यापासून मविआच्या आशा उंचावल्या ,पण त्यानंतरच्या काळात राज्य शासनाकडून लाडकी बहीण योजना यासारख्या अन्य योजनांमुळे लोकसभेप्रमाणेच चित्र राहण्याची शक्यता कमी आहे. कोणत्या भागात अधिक मतदान करून घेण्यात उमेदवार यशस्वी होतात, त्यावर निवडणुकीचा कल निश्चित होऊ शकतो.